सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

कवितेचं गाव…

ते रस्ते, ती वळणं सगळं जूनं जूनं होत गेलं ,
कित्येक वर्षात तिथे जाणं झालच नाहीये खरंतर….
आणि
माझी कविता मात्र तिथेच सापडतेय ….


ऋतू बदलणं सवयीचं झालं कधीतरी ,
वार्‍यापावसाचा कोवळा शहारा जरा फिकटलाच तसा…
तू आणि मी तसे भेटत नाही हल्ली हल्ली,
तरीही
माझी कविता मात्र तिथेच रहातेय ….


नव्या बदलांचं वावडं नाही तिला तसं,
माझ्याकडे येते ती अधेमधे… पाहुण्यासारखी …
नव्या गावी करमत नाही सांगणार्‍या वडिलधार्‍यासारखी,
परतून जाते मग आठवणींच्या गावी….


आपल्या पाउलखूणांचा मागोवा काढत ,
पावलांचे उमटलेले पुराण ठसे सांगत….
पुनश्च एकदा
माझी कविता तिथेच रमतेय  ….


देवळाच्या पायरीवर,
हात हातात घेऊन आपण पुढे निघालो….
चिरेबंदी दगडाची ती पायरी आहे जिथे ठाम,
तिथेच…
माझी कविता ’अजूनही’ तिथेच रहातेय !!


कवयित्री: तन्वी देवडे