सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

कवितेचं गाव…

ते रस्ते, ती वळणं सगळं जूनं जूनं होत गेलं ,
कित्येक वर्षात तिथे जाणं झालच नाहीये खरंतर….
आणि
माझी कविता मात्र तिथेच सापडतेय ….


ऋतू बदलणं सवयीचं झालं कधीतरी ,
वार्‍यापावसाचा कोवळा शहारा जरा फिकटलाच तसा…
तू आणि मी तसे भेटत नाही हल्ली हल्ली,
तरीही
माझी कविता मात्र तिथेच रहातेय ….


नव्या बदलांचं वावडं नाही तिला तसं,
माझ्याकडे येते ती अधेमधे… पाहुण्यासारखी …
नव्या गावी करमत नाही सांगणार्‍या वडिलधार्‍यासारखी,
परतून जाते मग आठवणींच्या गावी….


आपल्या पाउलखूणांचा मागोवा काढत ,
पावलांचे उमटलेले पुराण ठसे सांगत….
पुनश्च एकदा
माझी कविता तिथेच रमतेय  ….


देवळाच्या पायरीवर,
हात हातात घेऊन आपण पुढे निघालो….
चिरेबंदी दगडाची ती पायरी आहे जिथे ठाम,
तिथेच…
माझी कविता ’अजूनही’ तिथेच रहातेय !!


कवयित्री: तन्वी देवडे

सोमवार, १६ जून, २०१४

काढला संग्रह कवितांचा...



(चाल: ’ कानडा राजा पंढरीचा ’)

कोणालाही नाही वाटला,
खर्च फार याचा-
काढला संग्रह कवितांचा |धृ |

मेजावर तो विक्रीस सत्वर
कसा पसरला असा ढीग वर
कुपन ठेविले खास प्रतींवर
खप ना चार प्रतींचा ...
काढला संग्रह कवितांचा ..

परमभाग्य हे "नात्यां"साठी
उभे ठाकले "फुकटे" पाठी
उभा राहिला जमाव सावध
जणु की शोकसभेचा ...
काढला संग्रह कवितांचा ..

तो गझलेचे शेर वाचतो
हा चारोळ्या नित्य पाडतो
अभंगवाणित कोणी रमतो
वाली ना कवितेचा ...
काढला संग्रह कवितांचा ..

विडंबनकार: विजयकुमार देशपांडे


रविवार, ११ मे, २०१४

आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे...

"" आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे - ""
(चाल: आज चांदणे उन्हांत हसले, तुझ्यामुळे-)

आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे
नात्यातून बघ अंतर पडले, तुझ्यामुळे ...

घाव अंतरी बसतच होते
घर खरोखर सुखात होते
खर्चातून हैराण जाहले, तुझ्यामुळे ...

उसनवारीचे द्रव्य जमविले
व्याजच होते भारी कसले
द्र्व्यास्तव ते सर्व भांडले, तुझ्यामुळे ...

उगाच माझी होती दैना
खाली पाकिट मार्ग सुचेना
वादातून दाताड विचकले, तुझ्यामुळे ...

सदनि या जरी होती शांती
पाहुणे परंतु येता बोंब ती
आज शंख तरि मीच ठोकले, तुझ्यामुळे ..

विडंबनकार: विजयकुमार देशपांडे

बुधवार, ७ मे, २०१४

किती म्हाताऱ्याचे चाळे....

मूळ गीत: फिटे अंधाराचे जाळे
(एका बुजूर्ग नेत्यावरून हे सूचलंय)

किती म्हातार्‍याचे चाळे, गुंते नको त्या पाशात
लक्ष गौळणीच्याकडे, रमे अश्लील कोशात ..

श्रेष्टी जागे झाले सारे, मीडियाही जागा झाला
पर्व संपता माजोरी, उरति पापाच्या सावल्या
एक अनोखे ग्रहण, लागे म्हाताऱ्या नेत्यास (१)

गाव उंडारून झाली, किती रंगल्या त्या राती
राणी नवीन अज्ञात, जन्मे पुत्र तिच्यापोटी
आश्वासनपूर्ती नाही , जग भकास भकास (२)

झाला तरुण प्रकाश, पेटे मिटाया काळोख
म्हातार्‍याला डीएनएचा, कोर्ट कचेरी आदेश
खोबरे अब्रूचे झाले आता एकाकी प्रवास (३)


विडंबनकार: गजानन लोखंडे

रविवार, ४ मे, २०१४

रोज कौतुकात दंग बायको जरी

"" रोज कौतुकात दंग बायको जरी -""
( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी )

रोज कौतुकात दंग बायको जरी ,
लाटणे जरा जपून आज बघ करी |धृ |

तोच मित्र रोज सिगारेट ओढतो
थेट खिशातून तुझ्या नोट काढतो ,
गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो -
सावध केले मी तुला कितीदा तरी |१|

सांग मित्रमंडळास काय जाहले ?
कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले !
ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले -
एकटाच वाचशील काय तू तरी |२|

तू कधीच रंगढंग नाही उधळला !
मित्रमंडळात तरी कसा गुंगला ?
तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ...
हाय, धावली धरून लाटणे करी |३|

विडंबनकार: विजयकुमार देशपांडे

शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

वय अजुनी सरले नाही

मूळ गीत: भय इथले संपत नाही
कवी: ग्रेस
संगीतकार: हृदयनाथ मंगेशकर
गायिका: लता मंगेशकर
*****

वय अजुनी सरले नाही

नरड्यास खाज पण येते

मी संध्याकाळी गातो
जाली तू टंकलीस गीते

ते छंद, वृत्त, त्या जाती
चारोळी नव्या कवींची
परि गाता साधत नाही
गणित हे तालमात्रांचे

तो गूलकंद गोडूसा
कपड्यांस चिकटुनी गेला
मर्कट आधीच स्वभावे
त्यातही मद्य जणु प्याला

उत्स्फूर्त ही कविता अवघी
गुणगुणते शब्द कुणाचे
हे रचता साधत नाही
वीडंबन तव काव्याचे

विडंबनकार: प्रशांत उदय मनोहर

मूळ चालीत मी माझ्या सोयीप्रमाणे काही बदल केलेत ह्याची कृपया नोंद घ्यावी.

सोमवार, ६ जानेवारी, २०१४

झाडांनो...




झाडांनो..
तुम्हीच करा
आता मुखत्यार मला...
घेऊन टाका हात नी पाय माझे...
तुमच्या फांद्या द्या हवं तर मला..

एकाच ठिकाणी उभी राहीन...
आणि वारं जगेन पानांमधून...
पक्ष्यांना डोळे देऊन...
आकाश पांघरून बसेन चेहऱ्यावर...
निजेन स्वत:च्या (उसन्या)बुंध्यावर डोकं टेकवून...

मात्र आठवणीनं
रात्रीतून
परत घ्या
सगळं काही तुमचं
आणि ढकलून द्या मला
तुमच्या टेकडीवरून...

कारण
सकाळी जाग आल्यावर
मी ते परत करेन
ह्याची शाश्वती नाही....
माणूस ना शेवटी मी...! 

कवयित्री: चैताली अहेर