मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे...

" अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे - "
(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे)

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे
पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ||

रंगविले गॅरेजात कितिक देखणे
आवडले गाडीला खूप खर्चणे
स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१|

हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा
गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा
वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२|

...पाहु दे असेच तिला आता गंजता
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता
महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|

विडंबनकार: विजयकुमार देशपांडे

विडंबन इथे ऐका.

तोच थंडगार भात ..

" तोच थंडगार भात .."
(चाल: तोच चंद्रमा नभात, तीच तूही -)

तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी
एकांती मजसमीप तीच भीति का मनीं !

खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे
पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे
भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी !

सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ?
ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी !

त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा
डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा
नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !

विडंबनकार: विजयकुमार देशपांडे
विडंबन इथे ऐका.