काव्यवाचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काव्यवाचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

कवितेचं गाव…

ते रस्ते, ती वळणं सगळं जूनं जूनं होत गेलं ,
कित्येक वर्षात तिथे जाणं झालच नाहीये खरंतर….
आणि
माझी कविता मात्र तिथेच सापडतेय ….


ऋतू बदलणं सवयीचं झालं कधीतरी ,
वार्‍यापावसाचा कोवळा शहारा जरा फिकटलाच तसा…
तू आणि मी तसे भेटत नाही हल्ली हल्ली,
तरीही
माझी कविता मात्र तिथेच रहातेय ….


नव्या बदलांचं वावडं नाही तिला तसं,
माझ्याकडे येते ती अधेमधे… पाहुण्यासारखी …
नव्या गावी करमत नाही सांगणार्‍या वडिलधार्‍यासारखी,
परतून जाते मग आठवणींच्या गावी….


आपल्या पाउलखूणांचा मागोवा काढत ,
पावलांचे उमटलेले पुराण ठसे सांगत….
पुनश्च एकदा
माझी कविता तिथेच रमतेय  ….


देवळाच्या पायरीवर,
हात हातात घेऊन आपण पुढे निघालो….
चिरेबंदी दगडाची ती पायरी आहे जिथे ठाम,
तिथेच…
माझी कविता ’अजूनही’ तिथेच रहातेय !!


कवयित्री: तन्वी देवडे

सोमवार, ६ जानेवारी, २०१४

झाडांनो...




झाडांनो..
तुम्हीच करा
आता मुखत्यार मला...
घेऊन टाका हात नी पाय माझे...
तुमच्या फांद्या द्या हवं तर मला..

एकाच ठिकाणी उभी राहीन...
आणि वारं जगेन पानांमधून...
पक्ष्यांना डोळे देऊन...
आकाश पांघरून बसेन चेहऱ्यावर...
निजेन स्वत:च्या (उसन्या)बुंध्यावर डोकं टेकवून...

मात्र आठवणीनं
रात्रीतून
परत घ्या
सगळं काही तुमचं
आणि ढकलून द्या मला
तुमच्या टेकडीवरून...

कारण
सकाळी जाग आल्यावर
मी ते परत करेन
ह्याची शाश्वती नाही....
माणूस ना शेवटी मी...! 

कवयित्री: चैताली अहेर